नागपूर

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा नागपूर आंदोलन स्थगित; तोडगा काढण्यासाठी आज मुंबईत उच्चस्तरीय बैठक

Bacchu kadu Latest News : सह्याद्री अतिथिगृहावर सायंकाळी 7 वाजता बैठक; फडणवीस, शिंदे, पवार यांच्यासह 30 वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार

नागपूर :- शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली नागपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बच्चू कडू यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येण्याला होकार दिला असून, त्यानुसार आज (गुरुवार) सायंकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथिगृहावर शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.

या उच्चस्तरीय बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते उपस्थित असतील. तर, आंदोलकांकडून बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर, आणि अजित नवले हे शेतकरी नेते सरकारसोबत वाटाघाटी करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण या बैठकीला मुख्य सचिवांसोबतच विविध विभागांतील 30 वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित असतील. त्यामुळे आजच्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि अन्य मागण्यांवर महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत बच्चू कडू यांनी दिलेले निवेदन तसेच 7 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांवरील कार्यवाहीचा आढावा घेतला जाईल.

शेतकरी नेत्यांची एकजूट

बैठकीपूर्वी बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, या आंदोलनामुळे सर्व शेतकरी नेते एकत्र आले, हेच मोठे यश आहे. “आम्ही एकत्र आल्याने शेतकऱ्यांना बळ मिळते आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा विचार करत नाहीत,” असे ते म्हणाले.

आजच्या बैठकीत कर्जमाफी, पंजाबच्या धर्तीवर शेतमाल खरेदी केंद्रे, 20 टक्के बोनस आणि हमीभाव या प्रमुख विषयांवर चर्चा होईल. “आजच्या बैठकीनंतर जर तोडगा निघाला नाही, तर मुंबईवरून नागपूरला परत आल्यावर आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरवू,” असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0