Mumbai Fire : दक्षिण मुंबईत भीषण आग; कफ परेड मच्छिमार नगर येथील चाळीत दुर्घटना

•पहाटे लागलेल्या आगीत 15 वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
मुंबई :- दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरातील मच्छिमार नगर भागात आज (20 ऑक्टोबर 2025) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एका चाळीत भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या आगीमध्ये एका १५ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकी घटना
कफ परेड परिसरातील कॅप्ट प्रकाश पेठे मार्गावरील एका चाळीतील 1+1 घराच्या वरच्या मजल्यावर पहाटे 1 वाजताच्या सुमारास ही आग लागली. काही मिनिटांतच आग चाळीतील आणखी काही घरांमध्ये पसरली. आगीची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि 4.35 वाजेपर्यंत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
जखमी आणि मृतांची माहिती
या दुर्घटनेत एका 15 वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू झाला, तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्याच सेंट जॉर्ज रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
आगीचे कारण
सुरुवातीला ही आग फटाक्यांमुळे लागली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, अग्निशमन दल आणि पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानंतर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.पोलीस आणि अग्निशमन दल या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, तपासाअंती आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. या आगीच्या घटनेमुळे मच्छिमार नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


