DIG Harcharan Singh Bhullar : लाचखोर डीआयजी भुल्लरच्या घरी CBI चा छापा; 5 कोटी रोकड, सोन्याचे दागिने आणि लक्झरी गाड्या जप्त

DIG Harcharan Singh Bhullar : पंजाब पोलीस दलातील DIG हरचरण सिंग भुल्लर यांना 8 लाखांची लाच घेताना अटक; मोठे घबाड हाती
ANI :- केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करत पंजाब पोलीस दलातील रोपर रेंजचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (DIG) हरचरण सिंग भुल्लर यांना गुरुवारी रात्री अटक केली. DIG Harcharan Singh Bhullar कथितपणे आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडल्यानंतर सीबीआयने त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले, ज्यात मोठे घबाड लागले आहे.
सीबीआयच्या हाती लागलेले घबाड
सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदीगडमधील सेक्टर 40 येथील भुल्लर यांच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात अनेक मौल्यवान वस्तू आणि मालमत्ता जप्त करण्यात आली आहे:
रोकड: 5 कोटी
सोन्याचे दागिने: 1.5 किलो
लक्झरी वस्तू: 22 महागडी घड्याळे
आलिशान गाड्या: ऑडी (Audi) आणि मर्सिडीझ (Mercedes) यांसारख्या लक्झरी गाड्या
शस्त्रसाठा: एक पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर, एक डबल बॅरल बंदूक, दारूगोळ्यासह एक एअरगन
इतर: 40 लीटर उंची मद्याच्या बाटल्या
लाचखोरीचे प्रकरण काय?
2007 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या डीआयजी भुल्लर यांच्या विरोधात एका भंगार व्यापाऱ्याने तक्रार दाखल केली होती. व्यापाऱ्याच्या विरोधात 2023 साली दाखल झालेल्या एका एफआयआर (FIR) संदर्भात भुल्लर यांनी ही लाच मागितली होती.
सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, भुल्लर यांनी भंगार व्यापाऱ्याकडून नियमित मासिक हप्ता (ज्याला ते ‘सेवा-पाणी’ म्हणत असत) देण्याची मागणी केली होती. जर ही रक्कम दिली नाही, तर व्यापार संबंधित गुन्ह्यात अडकविण्याची धमकी भुल्लर यांनी दिली होती.
एफआयआर रद्द करण्यासाठी भुल्लर यांनी एका मध्यस्थाच्या माध्यमातून व्यापाऱ्याकडून 8 लाखांची लाच मागितली होती.
डीआयजी भुल्लर यांच्या अटकेनंतर सीबीआयने मध्यस्थ किरशानू यालाही अटक केली आहे. त्याच्याकडून देखील 21 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
दोन्ही आरोपींना आज (शुक्रवारी) चंदीगड न्यायालयात हजर केले जाणार आहे. डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांचे वडील महल सिंग भुल्लर हे देखील पंजाबचे माजी डीजीपी होते.


