Tilari Snail : पश्चिम घाटातील जैवविविधतेत भर; तेजस ठाकरे आणि सहकाऱ्यांनी शोधली केसाळ गोगलगायीची नवीन प्रजाती

Tilari Hair Snails : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारीच्या जंगलात ‘तिलारी हेअरी स्नेल’चा यशस्वी शोध; संशोधन ‘जर्नल ऑफ कॉन्कॉलॉजी’मध्ये प्रकाशित
मुंबई :- ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे Thackeray Wild Life प्रमुख संशोधक तेजस ठाकरे Tejas Thackeray आणि त्यांच्या चमूने पुन्हा एकदा पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेच्या खजिन्यात मोलाची भर घातली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी येथील निमसदाहरित जंगलामध्ये या चमूने केसाळ गोगलगायींच्या (Tilari Hairy Snail) एका नवीन प्रजातीचा यशस्वीरित्या शोध लावला आहे.
या महत्त्वपूर्ण शोधामुळे लहान आणि दुर्लक्षित प्रजातींच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली आहे. त्यांचा हा संशोधनपर लेख नुकताच ‘जर्नल ऑफ कॉन्कॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मॅग्झिनमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
जपानी ॲनिमेटरच्या नावाने नामकरण
गोगलगायीच्या या नवीन प्रजातीचे शास्त्रीय नामकरण अतिशय खास आहे. प्रसिद्ध जपानी ॲनिमेटर आणि स्टुडिओ घिबलीमधील सह-संस्थापक हायाओ मियाझाकी यांच्या नावावरून या प्रजातीला ‘लॅगोकाईलस हायाओमियाझाकी’ असे नाव देण्यात आले आहे. मियाझाकी यांच्या चित्रपटांमध्ये निसर्गाचे महत्त्व सुंदरपणे दर्शविले जाते. त्यांच्या या निसर्ग तत्त्वज्ञानाला आदरांजली म्हणून हे नामकरण करण्यात आले आहे.
तेजस ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, गोगलगायींसारख्या लहान प्रजाती निसर्गाचा अनमोल ठेवा असून त्या अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात. भविष्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून अशा दुर्लक्षित प्रजातींच्या संशोधनावर अधिक भर दिला जाईल.
तेजस ठाकरे यांचा शोध वारसा
तेजस ठाकरे आणि त्यांच्या चमूने यापूर्वीही अनेक दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे, ज्यामुळे त्यांना वन्यजीव संशोधनात एक नवी ओळख मिळाली आहे.
सापाची नवीन प्रजाती: त्यांनी पश्चिम घाटात ‘सह्याद्रीओफिस उत्तरघाटी’ या सापाच्या नवीन प्रजातीचा शोध लावला होता.
पालींच्या प्रजाती: त्यांनी ‘क्नेमास्पीस केव्हरनीकोला’ आणि ‘सी. पॅकामालियन्सेस’ या पालींच्या प्रजातींचा शोध लावला आहे. यापैकी तामिळनाडूच्या शेवरॉय पर्वतरांगेत सापडलेल्या ‘क्नेमास्पीस ठाकरेई’ या पालीला त्यांचे आडनाव देण्यात आले आहे.
इतर शोध: त्यांनी गोड्या पाण्यातील 20 हून अधिक खेकड्यांच्या प्रजाती तसेच सिंधुदुर्गातील आंबोली येथे ‘शिस्टुरा हिरण्यकेशी’ या सोनेरी रंगाच्या माशाच्या प्रजातीचाही यशस्वी शोध लावला आहे.



