ASI Satish Lathar Suicide : आयपीएस अधिकाऱ्याच्या आत्महत्येला वेगळे वळण! आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून संपवलं आयुष्य

•रोहतकमधील सायबर सेलमध्ये कार्यरत ASI सतीश लाठर यांची आत्महत्या ; मृत ASI च्या सुसाईड नोटमध्ये दिवंगत IPS वाय. पूरन कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
ANI :- हरियाणातील वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्येच्या (Y Puran Kumar Suicide) प्रकरणाला आता अत्यंत धक्कादायक वळण लागले आहे. त्यांच्याशी संबंधित एका प्रकरणाचा तपास करणाऱ्या रोहतक सायबर सेलमध्ये तैनात असलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) सतीश लाठर यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांना तीन पानांची सुसाईड नोट आणि एक व्हिडिओ मेसेज सापडला आहे. या सुसाईड नोटमध्ये मृत एएसआय सतीश लाठर यांनी दिवंगत आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
‘पूरन कुमार भ्रष्ट होते, अटक होईल म्हणून आत्महत्या केली’
आत्महत्या केलेल्या एएसआय लाठर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, “आयपीएस वाय. पूरन कुमार हे भ्रष्टाचारात सहभागी होते आणि जातीवादाचा आधार घेऊन व्यवस्थेवर नियंत्रण मिळवत होते.” या धक्कादायक पत्रात त्यांनी पुढे असाही दावा केला आहे की, “अटक होणार असल्याच्या भीतीनेच पूरन कुमार यांनी आत्महत्या केली.” आपण भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध हे ‘बलिदान’ देत आहोत, असेही त्यांनी नमूद केले असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृत एएसआय सतीश लाठर हे आयपीएस पूरन कुमार यांचा बॉडीगार्ड सुशील कुमार याच्याशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणाच्या तपास पथकाचा भाग होते.
आयपीएस अधिकाऱ्यावरही होता गुन्हा दाखल
यापूर्वी 7 ऑक्टोबर रोजी आयपीएस वाय. पूरन कुमार यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्या पत्नी, आयएएस अधिकारी अमनीत पी कुमार यांनी पूरन कुमार यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटच्या आधारावर हरयाणाचे डीजीपी शत्रुघ्न कपूर आणि रोहतकचे एसपी नरेंद्र बिजार्निया यांच्यासह 14 अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आता एएसआय सतीश लाठर यांच्या आत्महत्येमुळे आणि त्यांच्या सुसाईड नोटमधील गंभीर आरोपांमुळे आयपीएस पूरन कुमार प्रकरणाला पूर्णपणे वेगळी दिशा मिळाली आहे. मृत एएसआयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, सुसाईड नोट आणि व्हिडिओ फॉरेन्सिक तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीनंतर हरियाणा पोलीस दलातील अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे.


