ठाणे

Thane News : ‘टाऊनशिप’च्या नावाखाली नागरी सुविधांपासून वंचित ठेवले; हिरानंदानी इस्टेटच्या विकासकावर कारवाईची मागणी

खासदार नरेश म्हस्के आक्रमक; 5 हजार रहिवाशांना 25 वर्षे वाऱ्यावर सोडणार का? ; लोढा पॅराडाईज आणि रुस्तमजी गृहसंकुलातील चुकीच्या बांधकामावरही आयुक्तांचे लक्ष वेधले

ठाणे :- ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेट (Hiranandani Estate) येथील विकासकाने ‘टाऊनशिप’च्या नावाखाली अनेक वर्षांपासून रहिवाशांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवले आहे. याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत खासदार नरेश म्हस्के यांनी थेट नगरविकास विभागाकडे या विकासकावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टाऊनशिपमध्ये सुविधांचा अभाव

खासदार म्हस्के यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन रहिवाशांचे प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले की, ज्या मैदानात विकासक मॅरेथॉन घेतो, त्याच मैदानात स्थानिक रहिवाशांना खेळू दिले जात नाही. मोकळ्या भूखंडावर क्लब हाऊस, ॲम्पी थिएटर उभारले जाऊ शकते, पण टाऊनशिपचे नाव घेत या सुविधा नाकारल्या जात आहेत. “टाऊनशिप पूर्ण व्हायला अजून 25 वर्ष जातील, तोवर रहिवाशांना वाऱ्यावर सोडले जाणार का?” असा संतप्त सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला. त्यांनी आयुक्तांना नगरविकास खात्याचे सचिव असिम गुप्ता यांच्याकडे पत्रव्यवहार करण्याची सूचना केली आहे.

माजिवाडा येथील बांधकामावर टीका

यावेळी म्हस्के यांनी माजिवाडा येथील दोन मोठ्या गृहसंकुलांमधील समस्याही आयुक्तांपुढे मांडल्या:

लोढा पॅराडाईज: लोढा पॅराडाईज गृहसंकुलातील 13 इमारतींच्या तळमजल्यामध्ये थोड्याशा पावसानेही नाल्यातून येणारे पाणी तब्बल 10 फूट तुंबते, ज्यामुळे रहिवाशांच्या गाड्यांचे मोठे नुकसान होते.

रुस्तमजी: रहिवाशांनी आयुक्तांसमोर एक सादरीकरण करत रुस्तमजी विकासकाने केलेले चुकीचे बांधकाम आणि लोढा बिल्डरने सुविधा म्हणून दिलेले टेनिस कोर्ट आता डीपी रस्त्यात येत असल्याचा प्रकार निदर्शनास आणला.

कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन

याशिवाय, खासदार म्हस्के यांनी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सामावून घेणे, डाटा एन्ट्री कामगारांचे मानधन वाढवणे, सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी त्वरित देणे अशा विविध प्रश्नांवरही आयुक्तांशी चर्चा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0