Mumbai Fraud News : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून 10 कोटींची फसवणूक; ‘बडतर्फ सीआयएसएफ’ जवानाला दिल्लीतून अटक

Mumbai Latest job fraud News : करोडो रुपये चैनीखातर आणि ‘मराठी सिनेमा’ बनवण्यासाठी खर्च ; आरोपी निलेश राठोड विरोधात राज्यभर अनेक गुन्हे दाखल; मुंबई आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई :- केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांत सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दिल्लीतून अटक केली आहे. निलेश काशिराम राठोड (वय 33, रा. अकोला) या बडतर्फ सीआयएसएफ (CISF) जवानाने शेकडो तरुणांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. Mumbai Latest Job Fraud News
नोकरीसाठी घेतले 5 ते 15 लाख रुपये
नवी मुंबईतील (मूळ बीड) तक्रारदार संतोष खरपुडे यांच्या तक्रारीनुसार, आरोपी निलेश राठोड याने त्यांना आणि इतर तरुणांना सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्याने प्रत्येक तरुणांकडून 5 लाख ते 15 लाख रुपयांपर्यंत रक्कम उकळली. फसवणूक करण्यासाठी त्याने तरुणांना बनावट वैद्यकीय चाचण्या (Medical Test) आणि बनावट नियुक्ती पत्रे (Appointment Letters) देऊन त्यांची दिशाभूल केली. Mumbai Latest Scam News
गुन्हेगारीचा आकडा 10 कोटींवर जाण्याची शक्यता
सध्या दाखल गुन्ह्यात फसवणुकीची रक्कम 2.88 कोटी रुपये दाखवण्यात आली आहे. मात्र, तपासामध्ये ही रक्कम दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. निलेश राठोड विरोधात मुंबईतील आझाद मैदान, पुण्यातील डेक्कन, अकोला, वाशी (नवी मुंबई) तसेच इतर राज्यांमध्येही फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मुंबईतच 60 पेक्षा जास्त नागरिकांनी त्याच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल केले आहेत. Mumbai Latest Crime News
आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी निलेश राठोड याने फसवणूक करून जमा केलेले करोडो रुपये स्वतःच्या चैनीसाठी वापरले. याशिवाय, त्याने हा पैसा दोन मराठी सिनेमे बनवण्यासाठी खर्च केल्याचेही उघड झाले आहे.
दिल्लीतून अटक
आरोपी फरार झाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष पथक दिल्लीला रवाना झाले होते. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार यांच्या पथकाने 9 ऑक्टोबर 2025 रोजी आरोपी निलेश राठोड याला दिल्लीतील द्वारका मोड परिसरातून शिताफीने अटक केली.
ज्या नागरिकांची निलेश राठोड याने नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे, त्यांनी त्वरित मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


