Shetkari Akrosh Morcha : शेतकऱ्यांच्या ‘हंबरड्या’ने मराठवाड्याची राजधानी हादरली!

Shetkari Akrosh Morcha : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर :- अतिवृष्टी आणि गारपिटीने गलितगात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या तीव्र भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज (शनिवार, 11 ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हंबरडा मोर्चा’ काढला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांतील शेतकरी आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्याच्या राजधानीत (संभाजीनगर) पक्षाला गतवैभव मिळवून देण्याचा हा एक महत्त्वाकांक्षी राजकीय प्रयत्न मानला जात आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ‘गुलमंडी’ दणाणणार
हा ‘हंबरडा मोर्चा’ शहरातील ऐतिहासिक क्रांती चौकातून सुरू होऊन गजबजलेल्या गुलमंडी चौकात पोहोचेल. तिथे त्याचे जाहीर सभेत रूपांतर होईल, जिथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे महायुती सरकारवर जोरदार ताशेरे ओढून आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करतील.
ठाकरे गटाच्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देणे, अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देणे, पीकविम्यासाठी बदलण्यात आलेले निकष पूर्ववत करणे आणि पुरामुळे जनावरे व घरांचे झालेले नुकसान भरून काढणे, यांचा समावेश आहे. या मोर्चाला खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई आणि विधानपरिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित आहेत.
‘प्रसिद्धी वेड्या’ सरकारवर ठाकरेंचा निशाणा
मोर्चाला निघण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. “या सरकारला स्वतःच्या प्रसिद्धीचे वेड लागले आहे. सगळीकडे फक्त यांचेच पोस्टर्स आणि बॅनर्स दिसत आहेत. दुसरीकडे, शेतकरी आक्रोश करतोय. मी मराठवाड्यातील या हंबरडा मोर्चात सरकारला देण्यात आलेल्या लबाड पॅकेजचा योग्य समाचार घेणार आहे,” असे ते म्हणाले होते.
संभाजीनगरात दाखल झाल्यानंतर ठाकरे यांनी विश्रांती घेतली असून, लवकरच ते मोर्चास्थळी दाखल होतील. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांनी सुरू केलेले हे मोठे आंदोलन महायुती सरकारला आगामी निवडणुकीत मोठे आव्हान उभे करण्याची चिन्हे आहेत.


