Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या (रविवार) हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक ; मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

• कुर्ला ते वाशी मार्गावरील हार्बर लोकल 5 तास बंद ;बोरिवली-राम मंदिरदरम्यान पश्चिम रेल्वेवरही काम; प्रवासाचे योग्य नियोजन करण्याचे रेल्वेचे आवाहन
मुंबई :- रेल्वे रुळांची, ओव्हरहेड वायरची आणि सिग्नल यंत्रणेची नियोजित देखभाल व दुरुस्ती कामे करण्यासाठी रविवारी (12 ऑक्टोबर 2025) मुंबईतील हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे दोन्ही मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत होणार आहे.
हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक (5 तास)
कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर
वेळ :- सकाळी 11.10 ते दुपारी 4.10
परिणाम:
- लोकल सेवा रद्द: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.36 दरम्यान सुटणाऱ्या वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकल तसेच पनवेल, बेलापूर आणि वाशीहून सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 दरम्यान CSMT कडे येणाऱ्या गाड्या रद्द राहतील. *प्रवासाची पर्यायी सोय:
प्रवाशांसाठी CSMT–कुर्ला आणि पनवेल–वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवली जाईल. तसेच, सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रवाशांना ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान प्रवास करण्याची मुभा (Travel Authority) देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक
बोरिवली–राम मंदिर आणि राम मंदिर–कांदिवली स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गिकेवर
वेळ :- सकाळी 10 ते दुपारी 1 (काही ठिकाणी 2 वाजेपर्यंत वाढण्याची शक्यता)
परिणाम
- जलद लोकल: बोरिवली ते अंधेरीदरम्यान धावणाऱ्या सर्व अप जलद लोकल गाड्या धीम्या मार्गावरून वळवण्यात येतील.
- पाचव्या मार्गिकेवरील लोकल अंधेरी–बोरिवलीदरम्यान डाऊन जलद मार्गावरून धावतील. *काही लोकल गाड्या रद्द होऊन, काही गाड्यांना गोरेगावमार्गे हार्बर लाईनवर वळवण्यात येईल.
मध्य रेल्वेवर प्रवाशांना दिलासा
दरम्यान, मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–कल्याण दरम्यान रविवारी कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे या मार्गावरील लोकल सेवा नियमितपणे सुरू राहणार आहेत.
प्रवाशांनी नियोजित देखभाल ब्लॉकमुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन, प्रवासापूर्वी वेळ आणि मार्गाची माहिती घेऊन घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


