
Sanjay Raut On Election Commission : सोमवारी दुपारी बैठक; उद्धव, शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ आणि मनसे प्रमुख एकत्र
मुंबई :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील विरोधी पक्षांचे एक महत्त्वपूर्ण शिष्टमंडळ सोमवार, 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीच्या (मविआ) या शिष्टमंडळात मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray देखील उपस्थित राहणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी दिली आहे.
कोण-कोण असणार शिष्टमंडळात?
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या या सर्वपक्षीय शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समावेश असणार आहे.
सत्ताधाऱ्यांनाही निमंत्रण
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, निवडणूक आयोग हे एक संविधानिक पद आहे आणि प्रत्येकाच्या काही समस्या आहेत. त्यामुळे आम्ही भाजपच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. याव्यतिरिक्त महायुतीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही पत्र पाठवण्यात आले आहे.
‘लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न’
या भेटीबाबत संजय राऊत यांनी ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले आहे की, “निवडणूक आयोगाला भेटणे ही आता एक औपचारिकता आहे, तरीही लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवायला हवा. हे राजकारण नसून लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आहे.”
निवडणूक अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीनंतर, सर्व नेत्यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याची माहितीही राऊत यांनी दिली आहे. या सर्वपक्षीय बैठकीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘मविआ’ कोणती नवी रणनीती आखणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


