Pune Crime News : पुण्याच्या कोंढव्यात तपास यंत्रणांची छापेमारी; ‘आय लव्ह मोहम्मद’चे बॅनर्स झळकल्याने खळबळ

•मध्यरात्रीपासून 18 हून अधिक ठिकाणी संयुक्त ‘सर्च ऑपरेशन’; काही संशयित ताब्यात
पुणे :- पुणे शहरातील कोंढवा परिसरात आज (गुरुवार) मध्यरात्रीपासून महाराष्ट्र पोलीस, पुणे पोलीस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांनी मिळून मोठे संयुक्त सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. तब्बल 18 हून अधिक ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे.
या कारवाईदरम्यान, कोंढवा परिसरातील गल्लीबोळात आणि रस्त्यांवर ‘आय लव्ह मोहम्मद’ (I Love Mohammad) आशयाचे बॅनर्स झळकताना दिसत असल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
छापेमारी आणि बॅनरबाजीचा संबंध?
तपास यंत्रणा एका बाजूला कोंढवा परिसरात मोठी शोधमोहीम राबवत असताना, त्याच रस्त्यांवर दोन ते तीन ठिकाणी हे बळ्नर लावल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या छापेमारीचा आणि बॅनरबाजीचा काही संबंध आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे आणि पोलीस त्या दिशेने तपास करण्याची शक्यता आहे. सध्या परिसरात हजारो पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत.
दहशतवादी कटाच्या पार्श्वभूमीवर कारवाई
या संयुक्त कारवाईत काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कोंढवा परिसराचे महत्त्व असे आहे की, दोन वर्षांपूर्वी पुणे पोलिसांनी याच भागातून बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना अटक केली होती. त्यावेळी देशातील संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात तपास यंत्रणांना यश आले होते. त्याच भागात आता पुन्हा काही संशयित तपास यंत्रणांच्या नजरेत आल्याचे सांगितले जात आहे.



