मुंबई हादरली! ‘1.14 कोटींचा विषारी साठा’; गुटखा माफियांवर गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

Mumbai Police Busted Gutkha Racket : घाटकोपर ते नारपोलीपर्यंत कारवाईचा धडाका; दोन गोडाऊन सील, 8 आरोपी जेरबंद ; गोडाऊनमध्ये गुटखा ‘पॅक’ होताना रंगेहात अटक; गुटखा रॅकेटचा पर्दाफाश
मुंबई :- महाराष्ट्र शासनाने पूर्णतः प्रतिबंधित केलेला आणि आरोग्यास घातक असलेला 1 कोटी 14 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा अवैध गुटखा आणि पान मसाल्याचा साठा मुंबई गुन्हे शाखा, कक्ष-6 Mumbai Crime Branch Unit 6 ने दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून जप्त केला आहे. या कारवाईत 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून, मुंबई आणि ठाणे परिसरातील गुटखा रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. Mumbai Latest Crime News
या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची सुरुवात 4 ऑक्टोंबर रोजी घाटकोपर, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे परिसरात झाली. येथे मोहम्मद फिरोज कमरूजमा शेख (26 वय) याच्याकडून 13 लाख 44 हजार 900 किंमतीचा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवलेला असताना जप्त करण्यात आला होता. मोहमद फिरोज याच्यासोबत फैजान नसीम अन्सारी आणि नवाज मेहंदी अन्सारी या दोघांविरुद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चौकशीत मोहमद फिरोज याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, गुन्हे शाखेच्या पथकाने तपास पुढे नेला. त्यानुसार, 7/10/25 रोजी स्थानिक नारपोली पोलीस ठाणे (जिल्हा-ठाणे) येथील पोलिसांची मदत घेऊन पथकाने दोन गोडाऊनवर छापा टाकला. या ठिकाणी गोडाऊनचे चालक, सुपरवायझर आणि हमाल प्रतिबंधित गुटखा वाहनांमध्ये भरत असताना रंगेहात सापडले.
या गोडाऊन प्रकरणातील 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या दोन गोडाऊनमधून एकूण 1 कोटी 14 लाख 60 हजार 150 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात 76 लाख 54 हजार 700 किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला, गुटखा वाहतुकीसाठी वापरलेली 4 वाहने आणि 6 मोबाईल यांचा समावेश आहे. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य पुरवठादार ‘अरीफ भाई’ याचा शोध गुन्हे शाखा घेत आहे.

पोलीस आयुक्त देवेन भारती,पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.


