Mumbai News : मुंबईला ‘मेगा कनेक्टिव्हिटी’! नवी मुंबई विमानतळ आणि भूमिगत मेट्रो-3 चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

•मेट्रो-3 चा गोरेगाव आरे ते कफ परेडपर्यंतचा संपूर्ण 33.5 किमीचा टप्पा आजपासून सेवेत; दररोज 13 लाख प्रवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा.
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) दोन महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येत आहे. यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा आणि मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत असलेली मेट्रो एक्वा लाईन-3 च्या अंतिम टप्प्याचा समावेश आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे मुंबईतील कनेक्टिव्हिटी आणि वाहतुकीत मोठा बदल होणार आहे.
मेट्रो-3 आता संपूर्ण सेवेत
आज अंतिम टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर मुंबई मेट्रो लाईन-3 (एक्वा लाईन) आरे (गोरेगाव) ते कफ परेड असा संपूर्ण 33.5 किलोमीटर लांबीचा प्रवास मुंबईकरांना थेट करता येणार आहे.
अंतिम टप्पा: आज आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) ते कफ परेड या अंतिम टप्प्याचे लोकार्पण झाले.
या संपूर्ण भूमिगत मार्गामुळे दररोज 13 लाख प्रवाशांना फायदा होण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतील कफ परेड, फोर्ट आणि नरिमन पॉइंट यांसारख्या महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांना आता थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे (Phase 1) देखील उद्घाटन होत आहे.
खर्च व क्षमता: सुमारे 19,659कोटी रुपये खर्चून बांधलेला हा टप्पा मुंबईला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रदान करेल. पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर हे विमानतळ वर्षाला 90 दशलक्ष प्रवासी हाताळू शकेल आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करेल.
खासदार अरविंद सावंत गैरहजर
पंतप्रधानांच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांना निमंत्रण देण्यात आले होते. मेट्रो-3 चे अनेक स्थानके त्यांच्या मतदारसंघात येत असल्याने हे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, निमंत्रण पत्रिकेत आपले नाव नमूद नसल्याने खासदार अरविंद सावंत यांनी कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर प्रकल्प
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘मुंबई वन’ नावाच्या एका एकात्मिक कॉमन मोबिलिटी ॲपचे आणि शॉर्ट-टर्म एम्प्लॉयबिलिटी प्रोग्राम (STEP) चे देखील लोकार्पण होणार आहे. तसेच, पंतप्रधान मोदी उद्या (9 ऑक्टोबर) ब्रिटीश पंतप्रधान सर किअर स्टारमर यांची मुंबईत भेट घेणार आहेत.


