Uddhav Thackeray Group : बेस्ट कामगार सेनेत मोठा खांदेपालट! पराभवानंतर नेतृत्वावर ‘ठाकरे’ गटाची मोठी शस्त्रक्रिया; सचिन अहीर अध्यक्ष, नितीन नांदगावकर सरचिटणीस

Thackeray Best Group Member : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतील सपाटून पराभवाची पार्श्वभूमी; माजी अध्यक्ष सुहास सामंत यांनी संपूर्ण कार्यकारिणीसह दिला होता राजीनामा
मुंबई :- बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बेस्ट कामगार सेनेमध्ये मोठा खांदेपालट केला आहे. कामगार संघटनेची प्रतिमा पुन्हा उंचावण्यासाठी पक्षाने विधानपरिषदेचे आमदार सचिन अहीर यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. तर, उपनेते नितीन नांदगावकर यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पराभवानंतर कार्यकारिणीचा राजीनामा
बेस्ट कामगार सेनेला नुकत्याच झालेल्या पतपेढीच्या निवडणुकीत एकही उमेदवार निवडून आणता आला नव्हता, ज्यामुळे संघटनेची प्रतिमा धुळीस मिळाली होती. मनसे आणि बेस्ट कामगार सेनेने एकत्र पॅनेल करूनही कामगारांनी त्यांना नाकारले होते. या पराभवानंतर माजी अध्यक्ष सुहास सामंत यांनी संपूर्ण कार्यकारिणीसह राजीनामा दिला होता.
नवीन नेतृत्वाला मोठी जबाबदारी
या पार्श्वभूमीवर, संघटनेला नवी दिशा देण्यासाठी पक्षाने मोठे बदल केले आहेत:
अध्यक्ष: विधानपरिषदेचे आमदार सचिन अहीर यांची बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. अहीर हे भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस असून, त्यांना कामगार संघटना क्षेत्रातील चांगला अनुभव आहे.
सरचिटणीस: उपनेते नितीन नांदगावकर (जे मनसेतून ठाकरेंच्या शिवसेनेत आले आहेत) यांना सरचिटणीसपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पतपेढी निवडणुकीदरम्यान भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनेलने कामगार सेनेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, ज्यामुळे कामगार सेनेचे पदाधिकारी वादात सापडले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर, अहीर आणि नांदगावकर यांच्या नवीन नेतृत्वाखाली बेस्ट कामगार सेना पुन्हा एकदा कामगार क्षेत्रात सक्रिय होण्याचा प्रयत्न करणार आहे.



