Trombay Police : ट्रॉम्बे पोलिसांची सलग तिसरी धडक! वाशी टोलनाक्याजवळ थरारक पाठलाग करून ‘गांजा तस्कराला’ अटक, 2 किलो ड्रग्ज जप्त

Trombay Police Busted Drug Racket : देव विसर्जन बंदोबस्तात सापडलेल्या 8 किलो गांजा प्रकरणात मोठी कारवाई; दोन स्वतंत्र कारवाईत एकूण 10 किलो गांजासह दोन मोटार कार जप्त.
मुंबई :- ट्रॉम्बे पोलिसांनी अंमली पदार्थांच्या Trombay Police Drugs News तस्करांविरोधात सुरू केलेली ‘क्लीन-अप’ मोहीम तिसऱ्या दिवशीही यशस्वी ठरली आहे. एकापाठोपाठ एक अशा दोन महत्त्वाच्या कारवाई करत, पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण 10 किलोहून अधिक गांजा जप्त केला असून दोन तस्करांना अटक केली आहे.
पहिली कारवाई: देवी विसर्जन बंदोबस्तात सापडला 8 किलो गांजा
देवी विसर्जनाच्या बंदोबस्तादरम्यान, महाराष्ट्र नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ पोलीस हवालदार पवार, पोलीस शिपाई कोकने व एमएमएफ जवान होळंबे यांना एक संशयास्पद व्हॅगनार कार (किंमत 8 लाख) दिसली. तपासणी सुरू असताना चालकाने बॅग लपवण्याचा प्रयत्न केला. बॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये 1 लाख 60 हजार किंमतीचा 8 किलो 176 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला.
पोलिसांनी तत्काळ राहुल (पिंटू) शिंदे (वय 23, रा. कल्याण) याला अटक केली. या कारवाईत गांजा, कार, मोबाईल आणि तीन हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
दुसरी कारवाई: कल्याणपासून वाशीपर्यंत थरारक पाठलाग
पहिल्या कारवाईतील आरोपी राहुल शिंदेकडून चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी त्याचे साथीदार आणि त्यांचा मुख्य पुरवठादार राजू अंबादास शिंदे (वय 35) याचा शोध सुरू केला.
ट्रॉम्बे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे कल्याणपासून राजू शिंदेच्या मारुती सुझुकी कारचा थरारक पाठलाग केला. हा आरोपी वाशी टोलनाक्याजवळ दक्षिणवाहिनी मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांना सापडला.
राजू शिंदे याच्या ताब्यातून 40 हजार किंमतीचा 2 किलो 50 ग्रॅम गांजा, तसेच 5 लाख किमतीची मोटार कार, मोबाईल आणि 5 हजार 718 रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
सराईत गुन्हेगार जेरबंद
अटक करण्यात आलेला राजू शिंदे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी धाराशिव येथे अंमली पदार्थ विक्रीच्या कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल आहेत. त्याने जप्त केलेला गांजा चिता कॅम्प, महाराष्ट्रनगर, मानखुर्द परिसरात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती ऋता नेमलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुशिल लोंढे यांच्या नेतृत्वातील या पथकाने दोन दिवसांपूर्वी 40 ग्रॅम एमडी जप्त केल्यानंतर, अंमली पदार्थांविरुद्धची ही सलग तिसरी मोठी कारवाई केली आहे.



