Ajit Pawar : नाशिक चित्रनगरी प्रकल्पाला गती मिळणार! इगतपुरीतील 47 हेक्टर जमीन तातडीने वर्ग करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश

•दादासाहेब फाळके यांच्या जन्मभूमीत जागतिक मनोरंजन केंद्र; मुंढेवाडी येथील शासकीय जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला देण्यास महसूल विभागाला सूचना.
मुंबई :- नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी चित्रनगरी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (6 ऑक्टोबर) तातडीचे निर्देश दिले आहेत. मुंढेवाडी येथील ४७ हेक्टर शासकीय जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला वर्ग करण्यासंदर्भात महसूल विभागाने तातडीने पाऊले उचलावीत, असे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे नाशिक चित्रनगरी प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला.
नाशिकच का?
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, नाशिक ही भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी आहे. त्यामुळे येथे चित्रपटसृष्टी उभारणे केवळ सांस्कृतिकच नव्हे, तर आर्थिक, पर्यटन आणि प्रादेशिक विकासाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे.
नाशिककडे असलेले महामार्ग, रेल्वे, विमान वाहतुकीची साधने आणि कुंभमेळ्यामुळे झालेली पायाभूत सुविधा यामुळे चित्रनगरीसाठी नाशिक जिल्हा सर्वार्थाने अनुकूल असल्याचे त्यांनी नमूद केले.
जागतिक मनोरंजन क्षेत्राचे केंद्र
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भारताला जागतिक मनोरंजन क्षेत्राचे केंद्र बनविण्याच्या दृष्टिकोनाचा संदर्भ देत पवार म्हणाले की, महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी घ्यावी, यासाठी नाशिक चित्रनगरी प्रकल्प निर्णायक ठरेल. या प्रकल्पामुळे स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ, लघुउद्योग, हॉटेल व्यवसाय, पर्यटन, वाहतूक आणि सेवा क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रकल्पाची स्थिती
मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत माहिती दिली की, 2009 साली गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर नाशिक जिल्ह्यात चित्रपटसृष्टी निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली होती. 2012 मध्ये नियोजन विभागाने यासाठी 10 कोटी रुपये नियतव्यय मंजूर केला होता.
सध्या ‘के.पी.एम.जी.’ या सल्लागाराकडून प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेबाबत प्राप्त झालेल्या अहवालाचे विश्लेषण करण्याचे काम सुरू आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हा अहवाल प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नाशिकमध्ये चित्रनगरी व्हावी, या मताचे विभाग असल्याचे स्पष्ट केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी चित्रनगरीसोबत मनोरंजन पार्कही उभारण्यात यावे, अशी सूचना केली.


