Manikrao Kokate : रमी व्हिडिओ वाद कोर्टात! मंत्री कोकाटे यांनी रोहित पवारांविरुद्ध मानहानीच्या दाव्यात दिला जबाब; “माझ्या बदनामीमुळे मंत्रिपद गमावले”

Manikrao Kokate On Rohit Pawar : कोकाटे यांचा दावा: ‘जंगली रमी’ची जाहिरात बंद करतानाचा व्हिडिओ व्हायरल; पवारांकडे व्हिडिओ कसा पोहोचला, याची चौकशी व्हावी.
मुंबई :- ऑनलाइन रमी खेळल्याचा आरोप झाल्यानंतर चर्चेत आलेले राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे Manikrao Kokate यांनी आमदार रोहित पवार Rohit Pawar (शरद पवार गट) यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याची सुनावणी आज (6 ऑक्टोबर) नाशिक न्यायालयात झाली. या सुनावणीत कोकाटे यांनी स्वतः न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडली.
काही महिन्यांपूर्वी विधान परिषदेच्या सत्रात मंत्री कोकाटे मोबाईलवर कथितरित्या ‘जंगली रम्मी’ खेळत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या आधारे आमदार रोहित पवार यांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, ज्यामुळे राज्यात राजकीय खळबळ माजली होती.
न्यायालयात मांडलेला कोकाटेंचा जबाब
कोकाटे यांनी न्यायालयात आपला जबाब नोंदवताना सांगितले की, “माझ्या मोबाईलवर ‘जंगली रमी’ची जाहिरात आली होती, ती बंद करताना मला 15 ते 20 मिनिटे लागली. त्याच दरम्यानचा व्हिडिओ काढून आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर अपलोड केला. मी विधान परिषदेमध्ये स्पष्टीकरण देऊनही त्यांनी ट्विट करत माझी बदनामी केली.”
या बदनामीमुळे “मला कृषी खात्याचा मंत्रिपद गमवावे लागले, तसेच माझी पक्ष आणि वैयक्तिक प्रतिमा यांना मोठा धक्का बसला,” असे कोकाटे यांनी स्पष्ट केले.
व्हिडिओ निर्मितीबाबत प्रश्न
कोकाटे यांनी आपल्या युक्तिवादात व्हिडिओ कोणी आणि कसा काढला, यावर प्रश्नचिन्ह उभे केले. “रोहित पवार हे विधान परिषदेचे सदस्य नाहीत, तरीही त्यांच्याकडे हा व्हिडिओ कसा पोहोचला, याची चौकशी होणे महत्त्वाचे आहे,” असा युक्तिवाद त्यांनी केला.
कोकाटे यांचे वकील डॉ. मनोज पिंगळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “या व्हिडिओच्या निर्मितीमागे कोणते तंत्रज्ञान वापरले गेले, किंवा तो खरा आहे की नाही, याबाबत न्यायालयीन चौकशी आवश्यक आहे. या प्रकरणातील संपूर्ण सत्य चौकशीनंतर बाहेर येईल, असा आमचा विश्वास आहे.”
या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. एका बाजूला रोहित पवार आक्रमक भूमिकेत, तर दुसऱ्या बाजूला कोकाटे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यामुळे राजकीय वर्तुळात लक्ष वेधले गेले आहे.


