Pune Breaking News : पुण्यात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह! ड्युटी संपवून घरी जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावरच कोयत्याने प्राणघातक हल्ला

Pune Latest Crime News : लॉ कॉलेजरोडवरील घटना; ‘कट मारल्याच्या’ वादातून गुन्हे शाखेच्या अमोल काटकर यांच्या डोक्यात कोयत्याचे वार, गंभीर जखमी.
पुणे :- पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सामान्य नागरिक सोडाच, पण आता पोलीस कर्मचारीच सुरक्षित राहिले नसल्याचे दर्शवणारी एक धक्कादायक घटना लॉ कॉलेजरोडवर घडली आहे.
पोलिसावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
गुन्हे शाखा युनीट-३ Crime Branch Unit 3 मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमोल काटकर यांच्यावर रविवारी (5 ऑक्टोबर) रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा प्राणघातक हल्ला झाला. आपली ड्युटी संपवून काटकर घरी जात असताना लॉ कॉलेजरोडवर बाईकवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले.
प्राथमिक माहितीनुसार, ‘कट मारल्याच्या’ क्षुल्लक वादातून हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यात अमोल काटकर गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



