मुंबई

Mumbai News : मुंबईची ‘जीवनवाहिनी’ ठरली ‘मृत्यूचा सापळा’! गर्दीच्या धक्क्याने 31 वर्षीय MSF जवानाचा लोकलमध्ये पडून दुर्दैवी अंत

•Mumbai Local Train Accident : शुक्रवारी संध्याकाळी मीरा रोड-भाईंदर दरम्यान भीषण अपघात; ड्युटी संपवून गणवेशात घरी परतत असताना गणेश जगदाळे यांचा जीव गेला.

मुंबई :- मुंबई लोकल ही केवळ शहराची लाईफलाईन नसून ती मृत्यूचा सापळाही ठरत असल्याची धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. शुक्रवारच्या (4 ऑक्टोबर) संध्याकाळच्या भीषण गर्दीने महाराष्ट्र सुरक्षा दलातील (MSF) एक तरुण जवान गिळंकृत केला आहे. गणेश जगदाळे (वय 31) नावाच्या या जवानाचा चालत्या लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ड्युटी संपवून घरी जाताना घात

मिळालेल्या माहितीनुसार, मृत जवान गणेश जगदाळे हे दहिसर सिटी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. आपली ड्युटी संपवून ते दहिसर स्थानकातून विरार लोकल ट्रेनने नायगावकडे प्रवास करत होते.

शुक्रवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे लोकलमध्ये तुफान गर्दी होती. मीरा रोड आणि भायंदर स्थानकादरम्यान लोकल धावत असताना गर्दीच्या धक्काबुक्कीमध्ये गणेश जगदाळे यांचा तोल गेला. दरवाजावर उभे असताना झालेल्या या धक्क्यामुळे ते चालत्या ट्रेनमधून खाली पडले आणि गंभीर जखमी झाले.

डोक्याला गंभीर दुखापत, तत्काळ मृत्यू

अपघात होताच गणेश जगदाळे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गणवेश आणि ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. रेल्वे पोलिसांनी त्यांना कांदिवली येथील मुंबई महानगरपालिकेच्या शताब्दी रुग्णालयात नेले, मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवान गणवेशात असतानाच लोकलच्या अपघाताला बळी पडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रेल्वे पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. लोकल प्रवासातील सुरक्षितता आणि गर्दीचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0