Mumbai Crime News : मालमत्तेच्या वादातून मुंबई हादरली! मालाडच्या कुरारमध्ये मित्रानेच झाडल्या तीन गोळ्या; ‘अबीतुल्लाह’ची प्रकृती चिंताजनक

•मद्यपानादरम्यान वाद विकोपाला; पहाटे ‘गुड्डू बिहारी’ने देशी रिव्हॉल्व्हरमधून केला हल्ला
मुंबई :- आर्थिक आणि मालमत्तेच्या वादातून मुंबईत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. मालाड येथील कुरार परिसरात रविवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीवर त्याच्याच मित्राने गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अबीतुल्लाह उर्फ तुला बेगला (38 वय) उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरार गावात राहणाऱ्या अबीतुल्लाह बेगला भेटण्यासाठी त्याचा मित्र गुड्डू बिहारी एका साथीदारासह आला होता. शनिवार रात्रीपासून हे तिघे संजय नगरमधील एका खोलीत एकत्र बसून मद्यपान करत होते. पहाटे गप्पा सुरू असताना अचानक त्यांच्यात मालमत्तेवरून जोरदार वाद सुरू झाला.
दारूच्या नशेत गोळीबार
हा वाद इतका वाढला की, मद्याच्या नशेत असलेल्या गुड्डू बिहारीने आपल्या खिशातून देशी रिव्हॉल्व्हर बाहेर काढले आणि अबीतुल्लाह बेगवर तीन गोळ्या झाडल्या. जवळून गोळ्या झाडल्यामुळे बेग जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याच्या मानेवर आणि कानाजवळ गोळी लागल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारील लोक तातडीने घटनास्थळी धावले, त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आरोपी गुड्डू बिहारी आणि त्याचा साथीदार तेथून पसार झाले होते. गंभीर जखमी झालेल्या बेगला तातडीने डीएनए रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला जेजे रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
प्राथमिक तपासात हा गोळीबार मालमत्तेच्या वादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कुरार पोलिसांनी आरोपी गुड्डू बिहारी आणि त्याच्या साथीदाराविरोधात गोळीबार आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी कुरार पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


