Laxman Hake : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञातांकडून काठ्यांनी हल्ला; गाडीच्या काचा फोडल्या

•पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर हल्ल्याची घटना; हाके यांना कोणतीही शारीरिक इजा नाही
अहिल्यानगर :- ओबीसी आरक्षणासाठी राज्यभर लढा देणारे प्रमुख आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर काही अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यात घडली आहे.
आज सकाळी (शनिवारी) लक्ष्मण हाके हे दैत्य नांदूर (ता. पाथर्डी) येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेसाठी जात असताना हा हल्ला झाला. नाश्ता करून पुढे प्रवास सुरू असताना, आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांची गाडी अडवली आणि अचानक काठ्यांनी हल्ला चढवला.
वाहनाचे मोठे नुकसान, हाके सुरक्षित
या अचानक झालेल्या हल्ल्यात हाके यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. सुदैवाने या हल्ल्यात लक्ष्मण हाके यांना कोणतीही शारीरिक इजा झाली नसल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
“आता सहन होत नाही”; हाकेंची भावनिक फेसबुक पोस्ट
दरम्यान, या हल्ल्यानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये आपले मनोगत व्यक्त केले असून, भविष्यातील भूमिकेबाबत मोठे संकेत दिले आहेत.
हाके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून… मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगं आहे, मी बॅनर छापू शकत नाही, गाडीला पैसे देऊ शकत नाही, हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत. उपोषण, आंदोलन असो की मोर्चे, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात.”
संघर्षातील वाढत्या अडचणींबद्दल बोलताना ते पुढे म्हणतात, “ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहांना जोडत गेलो, लाखो माणसं जोडली, पण शत्रूची संख्या सुद्धा वाढत गेली, हल्ले झाले, झेलले, पण आत्ता सहन होत नाही.” यामुळे, उद्या (शनिवारी) दैत्यानांदूर येथील ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन. “मी आंदोलनात असेन किंवा नसेनही”, अशा शब्दांत त्यांनी भविष्यातील भूमिकेबाबत मोठी घोषणा करण्याचे संकेत दिले आहेत.


