मुंबई

Bhayandar News : ‘सीक्रेट हिरो’ बाईक चोर रंगेहात! अल्पवयीन मुलाने रचला तीन मोटारसायकल चोऱ्यांचा थरार, काशीमीरा पोलिसांनी केला पर्दाफाश

भाईंदर पूर्व परिसरातील गुन्हे उघडकीस; कौशल्यपूर्ण तपासाने ‘जुनियर क्रिमिनल’ अडकला

भाईंदर :- भाईंदर पूर्व परिसरात रात्रीच्या अंधारात एकामागून एक मोटारसायकल गायब होण्याच्या घटनांनी खळबळ उडवली होती. पण या चोऱ्यांमागे एखादी मोठी टोळी नसून, एका अल्पवयीन ‘विधी संघर्ष बालकाचा’ हात असल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे. काशीमीरा गुन्हे प्रकटीकरण शाखेने कौशल्यपूर्ण तपास करत या ‘जुनियर क्रिमिनल’ला पकडून त्याच्याकडून चोरीच्या तीन मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.

ॲक्टिवा चोरीची कहाणी

15 ते 16 सप्टेंबर 2025 च्या दरम्यान सोनम गोदावरी परिसरातून प्रिन्समकुमार संजय शहा यांची होंडा ॲक्टिवा 3जी (किंमत 15 हजार ) चोरीला गेली. हा गुन्हा नवघर पोलीस ठाण्यात दाखल होताच, तपास काशीमीरा गुन्हे प्रकटीकरण शाखेने हाती घेतला.

तपास पथकाची ‘सीक्रेट’ कामगिरी

या अल्पवयीन मुलाने अत्यंत सफाईदारपणे चोऱ्या केल्या होत्या, ज्यामुळे पोलिसांना त्याचा माग काढणे आव्हान होते. मात्र, बातमीदारांनी दिलेल्या खबरी आणि पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तांत्रिक तपासामुळे हा गुन्हेगार भाईंदर पूर्वेकडील असल्याचे निष्पन्न झाले. 24 सप्टेंबर रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

वडिलांसमक्ष केलेल्या चौकशीत त्याने केवळ ॲक्टिवा चोरीच नव्हे, तर टी.व्ही.एस. एन-टॉर्क आणि सुझुकी बर्गमॅन या आणखी दोन मोटारसायकलची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने तिन्ही चोरीच्या गाड्या हस्तगत केल्या आहेत.

पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी फत्ते केली आहे. मोटारसायकल चोरांविरुद्ध पोलिसांची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0