Uddhav Thackeray : ‘कर्जमाफीसाठी पंचांगात मुहूर्त पाहणार का?’; उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल, प्रति हेक्टरी 50 हजार मदतीची मागणी

•‘आत्महत्या करू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी’; बँकांकडून नोटीस आल्यास कार्यालयात आणून देण्याचे आवाहन
लातूर :- महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत, सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “कर्जमाफीसाठी योग्य वेळ कधी येणार, पंचांगात मुहूर्त पाहणार आहात का?” असा संतप्त सवाल त्यांनी सरकारला केला.
‘प्रति हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या’
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मराठवाड्यात पहिल्यांदाच इतके मोठे नुकसान झाले आहे.” त्यांनी पंजाबचे उदाहरण देत सरकारला घेरले. “जर पंजाबमध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळत असेल, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ती का दिली जात नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, सरकारकडून जाहीर झालेली मदत ही फारच तुटपुंजी असल्याचे त्यांनी म्हटले.
‘आत्महत्या करू नका, आम्ही सोबत आहोत’
बँकांकडून शेतकऱ्यांना येत असलेल्या नोटिसांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. “मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की, कोणीही आत्महत्या करू नये. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. जर बँकांकडून नोटीस आली, तर ती आमच्या कार्यालयात आणून द्या, आम्ही त्याचे पुढे काय करायचे ते बघू,” असे आश्वासन त्यांनी दिले.
कर्जमाफीचा इशारा
कर्जमाफीवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “अजूनही शेतकरी ती कर्जमाफी विसरलेला नाहीये, आता शेतकऱ्यांची मागणी आहे की सरसकट कर्जमाफी करावी,” असे ते म्हणाले. जर सरकारने कर्जमाफी केली नाही, तर शिवसेना शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.


