महाराष्ट्र

Dhananjay Munde : ‘या संकटात तुमच्यासोबत आहे’; धनंजय मुंडेंनी घेतली पूरग्रस्त गोदाकाठच्या गावांची पाहणी,शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

• ममदापूर येथे पुरामुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 4 लाखांची मदत सुपूर्त

बीड, परळी वैजनाथ, :- अतिवृष्टी आणि गोदा नदीला आलेल्या पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या परळी वैजनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर आज माजी मंत्री धनंजय मुंडे पोहोचले. त्यांनी तेलसमुख, बोरखेड, ममदापूर यांसारख्या गोदाकाठच्या गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

शेतकऱ्यांशी साधला संवाद

या दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे, घरांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे झालेले भीषण नुकसान पाहिले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत सांगितले की, “मी तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमच्यासोबत आहे. शासनाकडून 100% नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत मिळवण्यासाठी मी पाठपुरावा करेन. याव्यतिरिक्त येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठीही मी सदैव तत्पर आहे.”

ममदापूर येथे 4 लाखांची मदत

16 सप्टेंबर रोजी लिंगी नदीच्या पुरात वाहून गेल्याने ममदापूर येथील शिवराज कदम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. धनंजय मुंडे यांनी आज शिवराज यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि प्रशासनाच्या वतीने मंजूर झालेली 4 लाख रुपयांची मदत त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केली.

प्रशासनाच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील लोकांना अन्न-धान्य आणि इतर तातडीची मदत पोहोचवण्याचे काम सुरू असून, स्थानिक आपत्ती निवारण निधीतूनही मदत दिली जात आहे. मुंडे यांच्या या भेटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असून, आता सरकारकडून ठोस मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0