Cylinder Blast In Kandivali : कांदिवलीत सिलिंडर गळतीमुळे भीषण आग; 7 जण होरपळले, 6 महिलांची प्रकृती चिंताजनक

•राम किसन मेस्त्री चाळीतील दुकानात दुर्घटनेचा भडका, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
मुंबई :- मुंबईतील कांदिवली परिसरात स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून वायू गळती झाल्यामुळे भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात एकूण सातजण होरपळले असून, त्यापैकी सहा महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना बुधवारी (24 सप्टेंबर) सकाळी 9 वाजताच्या सुमारास मिलिटरी मार्गावरील ईएसआईसी रुग्णालयामागील राम किसन मेस्त्री चाळीतील एका दुकानात घडली.
अशी घडली दुर्घटना
राम किसन मेस्त्री चाळीतील एका दुकानात एलपीजी सिलिंडरला गळती लागली. सिलिंडरच्या मुख्य व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात वायू बाहेर पसरल्याने अचानक आगीचा भडका उडाला. आगीने लगेचच दुकानातील विद्युत यंत्रणा व विजेच्या तारांनाही पकड घेतली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले.
7 जण जखमी, 6 महिलांची प्रकृती गंभीर
या आगीत एकूण सातजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात शिवानी गांधी (51 वय), नीतू गुप्ता (31 वय), जानकी गुप्ता (39 वय), मनराम (55 वय), रेखा जोशी (47 वय), दुर्गा गुप्ता (30 वय) आणि पूनम (28 वय) यांचा समावेश आहे. त्यापैकी शिवानी, नीतू, जानकी आणि मनराम यांना जवळच्या ईएसआयसी रुग्णालयात, तर इतरांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर या सर्वांना पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी सहाजण 70 ते 90 टक्के भाजले असल्याने त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


