National Awards Winner 2025 : दिल्लीत बॉलिवूडचा जलवा; शाहरुख खानला ‘जवान’साठी, तर राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी’साठी राष्ट्रीय पुरस्कार

• मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार; विक्रांत मेस्सीचा ’12th फेल’साठी सन्मान
ANI :- 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण काल (24 सप्टेंबर) दिल्लीत मोठ्या दिमाखात पार पडले. या सोहळ्यात बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा सन्मान करण्यात आला. शाहरुखला त्याच्या ‘जवान’ चित्रपटातील दमदार अभिनयासाठी, तर राणीला ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव
या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण होते ते म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांचा सन्मान. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करत त्यांना सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या चार दशकांत 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या मोहनलाल यांनी मल्याळमसह तमिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
शाहरुख, राणी, विक्रांत यांची उपस्थिती
या सोहळ्याला बॉलिवूडचे तीन मोठे स्टार्स- शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि विक्रांत मेस्सी उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या तिघांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील ‘राहुल आणि टीना’ म्हणजेच शाहरुख आणि राणी एकत्र दिसल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी तो एक अविस्मरणीय क्षण होता. संपूर्ण सोहळ्यात दोघेही एकमेकांसोबत होते, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
अभिनेता विक्रांत मेस्सीला त्याच्या ‘12th फेल’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’चा पुरस्कार मिळाला. याच चित्रपटासाठी दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनाही गौरवण्यात आले.


