
Mumbai Local Railway Latest News : ठाणे-कल्याण आणि पनवेल-वाशी मार्गावर दुरुस्तीचे काम,पश्चिम रेल्वेवर रात्रीच्या ब्लॉकमुळे दिवसा प्रवास सुरळीत
मुंबई: उद्या, रविवारी (21 सप्टेंबर) मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ठाणे ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर तर पनवेल ते वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर दुरुस्तीचे काम केले जाईल. त्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा विलंब होण्याची शक्यता आहे. मात्र, पश्चिम रेल्वेवर रात्रीच्या ब्लॉकमुळे रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही. Mumbai Local Latest News
मध्य रेल्वे
ठाणे ते कल्याण या स्थानकादरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 या वेळेत जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेस सुमारे 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावतील. काही मेल-एक्स्प्रेस पाचव्या आणि सहाव्या मार्गावरून चालवल्या जातील.
हार्बर रेल्वे
पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाउन सकाळी 11.05 ते दुपारी 04.05 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या लोकल सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते पनवेलदरम्यानच्या अप आणि डाउन लोकल फेऱ्याही रद्द राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी CSMT ते वाशी आणि ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान लोकल उपलब्ध राहतील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेने वसई रोड ते विरारदरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्रीनंतर 12.15 ते रविवारी पहाटे 4.15 पर्यंत असेल. यामुळे रविवारच्या दिवसाच्या प्रवासावर कोणताही परिणाम होणार नाही आणि लोकल सेवा नियमितपणे सुरू राहतील.


