महाराष्ट्र

Pankaja Munde : ओबीसी आरक्षण संपणार या निराशेने शेतकऱ्याची आत्महत्या; पंकजा मुंडे यांनी घेतली कुटुंबीयांची भेट

•नातवाला नोकरी मिळणार नाही या चिंतेतून निवृत्ती यादव यांनी जीवन संपवले; हैदराबाद गॅझेटमुळे भीतीचे वातावरण

बीड :- मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याच्या आणि ‘हैदराबाद गॅझेट’च्या मुद्द्यावरून ओबीसी समाजात निर्माण झालेल्या भीतीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंबेजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील शेतकरी निवृत्ती यादव यांनी याच नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपवल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी यादव कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला.

निवृत्ती यादव यांना आपल्या नातवाच्या नोकरीची चिंता सतावत होती. गावात होणाऱ्या चर्चांमधून ओबीसी आरक्षण संपल्यामुळे त्याला नोकरी मिळणार नाही, या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. यापूर्वी वांगदरी येथील भरत कराड यांनीही याच मागणीसाठी नदीपात्रात उडी मारून जीवन संपवले होते. पंकजा मुंडे यांनी या दोन्ही कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

‘माझी हात जोडून विनंती आहे, कोणीही कच खाऊ नका; तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही’, पंकजा मुंडेंचे आवाहन

या दुर्दैवी घटनांवर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे यांनी भावूक आवाहन केले. “आज माझ्या मतदारसंघात अशा घटना घडल्यामुळे मी इथं आले आहे. माझ्या दोन्ही कुटुंबांना माझी हात जोडून विनंती आहे, कोणीही कच खाऊ नका. या गोष्टी करणाऱ्यांना सोडून द्या आणि संघर्षासाठी तयार राहा,” असे त्या म्हणाल्या.

“असे चुकीचे पाऊल उचलू नका, आपला जीव देऊ नका. आपल्या मागे आपला परिवार असतो आणि त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे. काहीही कुणाला अडचण येणार नाही, कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशाच प्रकारचे निर्णय होतील, असा मला पूर्ण विश्वास आहे,” असे सांगत मुंडे यांनी ओबीसी समाजाला धीर देण्याचा प्रयत्न केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0