Hingoli News : वसमत तालुक्यातील भेंडेगावात तणाव; शांतता राखण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा

•‘जरांगे समर्थक’ आणि ‘आक्षेपार्ह पोस्ट करणारा गट’ यांच्यात बाचाबाची, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
हिंगोली :- मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या वादातून हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील भेंडेगावात दोन गटांत वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत शांतता प्रस्थापित केली असून, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भेंडेगावातील एका व्यक्तीने मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. ही बाब लक्षात आल्यावर जरांगे यांचे समर्थक जाब विचारण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या घरी गेले.
यावेळी दोन्ही गटांत जोरदार बाचाबाची झाली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून करुंदा पोलिसांनी तातडीने गावात धाव घेतली आणि दोन्ही गटांना शांत केले. यानंतर जरांगे समर्थक करुंदा पोलीस ठाण्यात जमा झाले आणि त्यांनी आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून व्हिडिओ बनवणाऱ्या आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू असून, पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे


