
CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi : ‘संविधानिक संस्थांचा अपमान करण्याचे गोबेल्स तंत्र राहुल गांधी वापरत आहेत’; फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबई :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडणार अशी घोषणा केली होती, पण ते साधा ‘लवंगी फटाका’ही फोडू शकले नाहीत. त्यांनी केवळ फुसका बार लावला, ते खोटे बोलण्यात सराईत आहेत, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. Maharashtra Latest Political News
राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले. महाराष्ट्रातील निवडणुकीचा संदर्भ देत त्यांनी हे आरोप केल्यावर फडणवीस यांनी लगेच पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांचे आरोप फेटाळून लावले. “रोज खोटे बोलायचे, हे गोबेल्सचे तंत्र राहुल गांधी वापरत आहेत,” असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, निवडणूक आयोगाने अनेकदा नोटीस देऊनही राहुल गांधी त्यांच्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ एकही पुरावा आयोगासमोर किंवा न्यायालयात सादर करू शकले नाहीत. “प्रत्येक वेळी प्रसिद्धीमाध्यमांसमोर येऊन खोटे बोलण्याची त्यांची हिंमत वाखाणण्याजोगी आहे,” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
‘महाराष्ट्रातील पराभव राहुल गांधींच्या जिव्हारी लागला’
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील पराभव राहुल गांधींच्या जिव्हारी लागल्यामुळे ते वारंवार महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत आरोप करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली. काँग्रेसने निवडणूक जिंकणार अशा भ्रमात हॉटेल बुक केली होती आणि मंत्रिमंडळाची रचनाही तयार ठेवली होती, पण जनतेने त्यांना धक्का दिला, असेही ते म्हणाले.
“राहुल गांधी हे निवडणूक आयोग, न्यायपालिका यांसारख्या संविधानिक संस्थांचा अपमान करत आहेत. खोटे बोलून बिहारमधील निवडणूक जिंकता येईल असे त्यांना वाटत आहे, पण बिहारची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे,” असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.


