Gopichand Padalkar: मर्यादा ओलांडल्या! भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका

Gopichand Padalkar: ‘जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद आहे असं वाटत नाही!’ पडळकरांचे वादग्रस्त वक्तव्य
सांगली :- महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये विरोधकांवर टीका करताना काही मर्यादा पाळल्या जातात, अशी परंपरा आहे. मात्र, भाजप आमदार गोपीचंद पडळकरGopichand Padalkar यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील Jayant Patil यांच्यावर टीका करताना सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले आहे. सांगली जिल्ह्यातील जत येथे बोलताना पडळकरांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर थेट आरोप केला की, त्यांनी एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला. “याने महाराष्ट्र कसा चालवला? जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे,” असे म्हणत त्यांनी आपल्या टीकेची सुरुवात केली.
‘राजारामबापूंची औलाद वाटत नाही’
पडळकर यांनी आपल्या भाषणात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. “जर मी कुणाकडून पैसे घेतले असतील, तर खंडणीचा गुन्हा दाखल करता येतो का, हे पाहण्यासाठी जयंत पाटलांनी जतमध्ये माणसे पाठवली,” असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर “पण हा गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही,” असे आक्षेपार्ह विधान त्यांनी केले. तसेच, “हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे, काहीतरी गडबड आहे,” असे वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केले.
सांगली जिल्ह्याच्या राजकारणात गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वाद सातत्याने चर्चेत असतो. याआधीही त्यांनी अनेकदा एकमेकांवर टीका केली आहे, पण जतमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे या वादामध्ये आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे.


