महाराष्ट्र
Trending

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा हाहाकार; शेती पाण्याखाली, अनेक भागांना पुराचा फटका

• बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस

मुंबई :- गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पाऊस अपेक्षित असून, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कृषी क्षेत्राला मोठा फटका

या सततच्या पावसामुळे राज्याच्या कृषी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात सुमारे 7 हजार हेक्टरपेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झाले असून, 35 गावे बाधित झाली आहेत. केळी, कापूस, सोयाबीन आणि मका यांसारखी महत्त्वाची पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यातही दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे शहराच्या विविध भागांमध्ये पाणी शिरले. नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही अनेक भागांमध्ये पाणी साचलेले आहे. जालना जिल्ह्याला 19 सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट देण्यात आला आहे.

नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूर, नागरिकांचे बचावकार्य सुरू

सततच्या पावसामुळे नांदेडमध्ये गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहराच्या काही सखल भागांमध्ये, विशेषतः वसरणी भागातील पंचवटी नगरात गोदावरीचे पाणी घरांमध्ये शिरले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि बोटींच्या मदतीने आठ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. गोदावरी नदीला आलेल्या या पुराचे मुख्य कारण विष्णुपुरी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आहे. विष्णुपुरी धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले असून, सध्या 1 लाख 62 हजार क्युसेक वेगाने पाणी गोदावरीच्या पात्रात सोडले जात आहे.

याचबरोबर, राज्याबाहेरही पावसाचा कहर सुरू असून, पंजाबमध्ये हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचे ढग कायम राहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0