
Pune Rain Latest News : शहरभर वाहतूक कोंडी, उपनगरांतही पावसाचा हाहाकार; घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’
पुणे :- गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झालेल्या पावसाने पुण्यात आज पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. दुपारी अचानक सुरू झालेल्या तुफान पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक भागांत पाणी साचले आहे. विशेषतः मार्केट यार्ड परिसरात पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे.
मार्केट यार्डमध्ये गोंधळाची परिस्थिती
गेल्या तासभरापासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे रास्ता पेठ, डेक्कन, जंगली महाराज रोड यांसारख्या मुख्य रस्त्यांवर पाणी साचले आहे. मार्केट यार्डमध्ये तर अक्षरशः पाणी भरले असून, शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला भाजीपाला आणि फळे पाण्यात वाहून गेली. अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचीही मोठी तारांबळ उडाली.
उपनगरांनाही झोडपले
शहरातील मध्यवर्ती भागाबरोबरच धायरी, हडपसर, वाघोली, खराडी, चंदननगर, औंध, बाणेर यांसारख्या उपनगरातही पावसाने जोरदार बॅटिंग केली. कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, काही सोसायट्यांमध्येही पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक जण रेनकोट आणि छत्र्या न घेता बाहेर पडल्याने त्यांना आडोसा शोधावा लागला. अचानक पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली.
राज्यावर पावसाचा जोर कायम
राज्यावर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे परतीच्या पावसाला पोषक वातावरण मिळाले आहे. यामुळे पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुण्याजवळील घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, सोलापूर आणि कोकण किनारपट्टीवरही जोरदार पावसाची नोंद झाली आहे.



