Mumbai Rain Update : मुंबईसह राज्यात पावसाचा जोर कायम; हवामान विभागाचा ‘मेघगर्जनेसह पावसा’चा इशारा

•13 जिल्ह्यांतील 166 मंडळांत अतिवृष्टीची नोंद; उजनी, वीर धरणातून पाण्याचा विसर्ग
मुंबई :- गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मुंबईसह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही जोरदार पाऊस सुरू असून, आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना आजही मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी
पूर्व विदर्भ आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी राज्याच्या 13 जिल्ह्यांतील 166 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. यामध्ये रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, बीड जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, महाड आणि माणगाव तालुक्यांतील अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टी झाल्याचे समोर आले आहे.
धरणे भरली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
भीमा आणि नीरा खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. उजनी धरण 100 टक्के भरल्याने धरणातून 1 लाख क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे. याचप्रमाणे वीर धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे, नदीकाठच्या गावांना धरण व्यवस्थापनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
विमानसेवेवर परिणाम
राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सोमवारी पुण्याहून नागपूरकडे जाणारे विमान रद्द करण्यात आले, तर नागपूरहून मुंबई आणि दिल्लीला जाणारी विमाने एक तास उशिराने रवाना झाली. मुंबई विमानतळावर कमी दृश्यमानतेमुळे अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांना विलंब झाला, तर काही विमानांना दिल्लीसारख्या पर्यायी विमानतळांवर वळवण्यात आले.
परतीचा पाऊस
याचदरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पश्चिम राजस्थानमधून माघार घेतली असून, त्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आज राजस्थानच्या काही भागांसह गुजरात आणि पंजाबमधूनही मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे.


