Virar Crime News विरार पोलिसांची हातभट्टीवर धडक कारवाई; लाखो रुपयांची अवैध दारू जप्त

• बेकायदेशीर दारूचे अड्डे उद्ध्वस्त, 77,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त ; ‘डीएनए’वर कारवाई, 5 गुन्हे दाखल; अवैध धंद्यांना चाप
विरार :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अवैध धंदेविरोधी अभियानांतर्गत विरार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन ठिकाणी गावठी हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करत पोलिसांनी सुमारे 77,550 रुपयांची अवैध दारू आणि दारू बनवण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल (वॉश) जप्त केला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरफपाडा, देवीचापाडा आणि खंदारपाडा येथे लपून छपून गावठी हातभट्टी चालवली जात होती. या माहितीच्या आधारे विरार पोलिसांनी विशेष पथके तयार केली आणि धडक कारवाई केली.
लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईदरम्यान, पोलिसांनी 10,800 रुपयांची तयार गावठी दारू आणि 66,750 रुपयांचा दारू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त केला. या तिन्ही ठिकाणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये (Maharashtra Prohibition Act) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यासोबतच, विरारच्या मनवेलपाडा भागात अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन ठिकाणांवरही पोलिसांनी छापे टाकले. या कारवाईत 2500 रुपयांची दारू जप्त करण्यात आली असून, आणखी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एकूण पाच कारवायांमध्ये पोलिसांनी अवैध दारू बनवणाऱ्या आणि विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे. या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना मोठा चाप बसला आहे.


