Thane News : ठाणे लोकसभा निवडणूक याचिका हायकोर्टाने फेटाळली; खासदार नरेश म्हस्के यांची खासदारकी कायम

•निवडणूक अर्ज लपविल्याचा आरोप फेटाळला; म्हस्के यांच्या विजयावर शिक्कामोर्तब
ठाणे :- ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (मंगळवारी) फेटाळून लावली. ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे म्हस्के यांची खासदारकी कायम राहणार असून, त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे.
माजी खासदार राजन विचारे यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा न्यायालयाचा निर्णय
न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या एकलपीठाने या याचिकेवर प्रदीर्घ सुनावणी घेतली होती. आज निर्णय देताना न्यायालयाने विचारे यांनी म्हस्के यांच्यावर केलेले आरोप मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला.
विचारे यांचा नेमका आरोप काय होता?
लोकसभा निवडणुकीत नरेश म्हस्के यांना 7 लाख 34 हजार 231 मते मिळाली होती, तर राजन विचारे यांना 5 लाख 17 हजार 22p मते मिळाली होती. पराभवानंतर विचारे यांनी म्हस्के यांच्या निवडीला आव्हान दिले होते.
विचारे यांनी आपल्या याचिकेत असा आरोप केला होता की, म्हस्के यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जात दंगलीच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आल्याची माहिती लपवली. तसेच, उमेदवारांनी आपल्यावरील गुन्हेगारी खटल्यांची माहिती मतदारांना देणे अनिवार्य असताना, म्हस्के यांनी या नियमाचे उल्लंघन केल्याचा दावा विचारे यांनी केला होता. मात्र, न्यायालयाने हे सर्व आरोप फेटाळले.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नरेश म्हस्के यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांची खासदारकी सुरक्षित राहिली आहे.


