मुंबई

Kalyan News : डोंबिवलीतील ‘चैन स्नॅचिंग’ टोळी आता कल्याणमध्ये? ‘पडघा कुठे आहे’ असे विचारून ज्येष्ठाची सोनसाखळी हिसकावली!

•​रेनकॉट घालून आलेल्या दोन चोरट्यांनी 45 हजारांची साखळी लुटली, शहरात भीतीचे वातावरण; पोलिसांनी दिले सतर्क राहण्याचे आवाहन.

कल्याण :- गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत महिलांना लुटून हैदोस घालणारी ‘चैन स्नॅचिंग’ टोळी आता कल्याणच्या दिशेने वळली आहे की काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कल्याणमध्ये एका 58 वर्षीय व्यक्तीची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

​ही धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कल्याण पूर्वेतील म्हात्रेनाका परिसरात घडली. सुरेश नामदेव कारवे (58 वय) हे आपली दुचाकी घेऊन जात असताना वाहतूक कोंडीत अडकले. त्याच वेळी, हेल्मेट आणि रेनकोट घालून दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी त्यांना अडवले. पाठीमागे बसलेल्या चोरट्याने सुरेश यांना “काका, पडघा कुठे आहे?” असे विचारले. सुरेश यांनी त्यांना रस्ता दाखवल्यानंतर, चोरट्याने अचानक त्यांच्या मानेवर जोरदार थाप मारली आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतली.

​सुरेश यांनी साखळी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण चोरट्यांनी ती जबरदस्तीने हिसकावून घेतली. या झटापटीत साखळी तुटली आणि तिचा काही भाग सुरेश यांच्या हातात राहिला, तर उर्वरित 45 हजार रुपयांची साखळी चोरट्यांनी पळवली. अवघ्या काही सेकंदात हा प्रकार घडला आणि चोरट्यांनी 100 फुटी रस्त्याने सुसाट वेगाने पळ काढला.

​या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, डोंबिवलीतही अशाच प्रकारे दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपयांच्या साखळ्या चोरण्यात आल्या होत्या. त्यामुळे हीच टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्याची शक्यता आहे. वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, विशेषतः गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागिने परिधान करून न जाण्याचा सल्ला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0