अजित पवारांच्या ‘त्या’ वादग्रस्त व्हिडिओमुळे नवा ट्विस्ट; आमदार अमोल मिटकरींनी आयपीएस अधिकाऱ्याच्या कागदपत्रांची चौकशीची केली मागणी

•उपमुख्यमंत्र्यांचा बचाव करण्यासाठी मिटकरींनी थेट यूपीएससीला लिहिले पत्र, प्रकरणाला गंभीर वळण
मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संभाषणाच्या व्हायरल व्हिडिओमुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी अजित पवारांवर महिला अधिकाऱ्यांबाबत ‘दादागिरी’ करत असल्याचा आरोप केला. या प्रकरणावर आता नवा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) पत्र लिहून पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आमदार मिटकरी यांनी 5 सप्टेंबर रोजी यूपीएससीच्या सचिवांना हे पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी अंजना कृष्णा यांनी सेवेत रुजू होताना सादर केलेली शैक्षणिक, जात आणि इतर कागदपत्रे तसेच प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता असावी, यावर मिटकरी यांनी भर दिला आहे. अजित पवारांशी झालेल्या कथित वादग्रस्त संभाषणांनंतर अधिकाऱ्याच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करत, त्यांनी सेवेत दाखल होताना काही अनियमितता केली आहे का, हे समोर आणणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
अजित पवारांनी या प्रकरणात आपले स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, त्यांचा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर परिस्थिती शांत ठेवण्याचा होता. तसेच, महिला अधिकाऱ्यांबद्दल आपल्याला सर्वोच्च आदर असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
अजित पवारांना मित्र पक्षच अडचणीत आणत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. आता मिटकरी यांनी थेट यूपीएससीचा दरवाजा ठोठावल्याने हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मिटकरींच्या मागणीवर आता यूपीएससी काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


