Maratha Protest : मराठा आंदोलकांवर मुंबईत 9 गुन्हे दाखल

•बेकायदेशीर जमाव आणि रस्ता रोको केल्याचा आरोप; अद्याप कोणालाही अटक नाही
मुंबई :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी तब्बल नऊ गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व गुन्हे सोमवारी नोंदवण्यात आले असून, अद्याप कोणत्याही आंदोलकाला अटक करण्यात आलेली नाही.
नेमके आरोप काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे गुन्हे बेकायदेशीर जमाव जमवणे, रस्ता रोको करणे आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे यांसारख्या कलमांखाली नोंदवण्यात आले आहेत. काही आंदोलकांनी जबरदस्तीने क्रिकेट क्लब ऑफ इंडिया परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
आझाद मैदान पोलीस ठाण्यात तीन, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दोन, तर एमआरए मार्ग, जे.जे. मार्ग, डोंगरी आणि कुलाबा येथील पोलीस ठाण्यांत प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे गुन्हे सोमवार, 1 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले असून, आंदोलनात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
या गुन्ह्यांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असल्याने अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
सरकारची आश्वासने आणि गुन्हे मागे घेण्याची शक्यता
दरम्यान, राजकीय आंदोलनांमध्ये दाखल झालेले गुन्हे काही महिन्यांनंतर मागे घेण्यात येतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आंदोलकांनी वाहतूक ठप्प करणे आणि पोलिसांनी दिलेल्या अटींचे उल्लंघन करणे यासंबंधी तक्रारी होत्या.
सरकारने मंगळवारी मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि आंदोलक आपापल्या गावाकडे परतले. आंदोलनाची परवानगी शनिवारपर्यंतच असूनही, हे आंदोलन सुरू ठेवण्यात आले होते, असेही स्पष्ट झाले आहे.


