ठाणेमुंबई
Trending

3 नंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये: आझाद मैदानातील वाहने हटवण्यास सुरुवात

Maratha Reservation Latest Update : पोलिस-आंदोलकांमध्ये वादावादी; ‘सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है’ घोषणांनी परिसर दुमदुमला

मुंबई :- मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेले आंदोलन गुंडाळण्यासाठी प्रशासनाने आता थेट कारवाई सुरू केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, मंगळवारी दुपारी 3 वाजेनंतर पोलिसांनी आझाद मैदान परिसरातील वाहने हटवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावादीच्या घटना घडल्या. परिस्थिती हाताळण्यासाठी सहपोलीस आयुक्तांसह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरले.

अधिकारी स्वतः मैदानात

उच्च न्यायालयाने आझाद मैदान रिकामे करण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत दिली होती. या आदेशाचे पालन करण्यासाठी पोलिसांनी दुपारपासूनच ध्वनीक्षेपकावरून वाहने हटवण्याचे आणि परिसर रिकामा करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली. मात्र, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. मुंबई महापालिका मुख्यालयासमोर जेवणाचे साहित्य घेऊन उभ्या असलेल्या वाहनांना काढण्यासाठी पोलीस गेले असता, आंदोलकांनी विरोध केला. “ही वाहने हटविली तर आंदोलकांना जेवण कोण देणार?” असा सवाल करत आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जत घातली.

यावेळी सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, पोलीस उपायुक्त नवनथा ढवळे आणि निमित्त गोयल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः मैदानात उतरून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला.

आंदोलकांच्या घोषणाबाजी

पोलिसांच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करती है’ आणि ‘पाटील पाटील’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानिक पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आणि शीघ्र कृती दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. “आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आहोत. आंदोलकांनी सहकार्य करावे,” असे आवाहन सहपोलीस आयुक्त चौधरी यांनी केले.

आंदोलकांची फलकबाजी

या आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी फलक हातात घेतले होते. एका आंदोलकाच्या शर्टावर ‘मी जरांगे’ असे लिहिलेले होते, त्यावर रोषणाई करण्यात आली होती. तर दुसऱ्या एका फलकावर भाजपवर टीका करण्यात आली होती. “न्यायालय, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार सारेच भाजपचे आहेत, मग आरक्षण देण्यात कुठे अडचण आहे?” असा सवाल या फलकातून विचारण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0