
Advocate Sadawarte On Manoj Jarange Patil : ‘आझाद मैदाना’ला पुढील दोन आठवडे परवानगी नाही; मुंबईतील गणेशोत्सवासाठी न्यायालयाचा निर्णय
मुंबई :- मराठा आरक्षण Maratha Arkshan आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, जरांगे यांना पुढील दोन आठवडे मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिला आहे. या निर्णयानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली असून, त्यांच्यावर ‘मग्रुरीची’ भाषा वापरत असल्याचा आरोप केला आहे.
“जरांगे माजला आहे. त्याला अटक झाल्यानंतरच कायदा कळेल,” अशा शब्दांत सदावर्ते यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “मुंबईला अस्थिर करण्याचा जो कुणी प्रयत्न करेल, त्याला कायदा त्याची जागा दाखवेल. मनोज जरांगे न्यायालयापेक्षा मोठे नाहीत.”
‘पवार-ठाकरे यांच्या हातातले बाहुले’
सदावर्ते यांनी जरांगे यांच्या आंदोलनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आम्ही रीतसर पोलिसांकडे तक्रार दिली होती आणि न्यायालयातही अर्ज केला होता. जरांगे यांचे आंदोलन वरकरणी दिसत असले, तरी त्याचा आत्मा राजकीय आहे. ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांच्या हातातील बाहुले आहेत.” यापुढे त्यांचे कोणतेही बेकायदा कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही सदावर्ते यांनी दिला.
उच्च न्यायालयाचा निर्णय
गणेशोत्सवादरम्यान 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करण्याच्या जरांगे यांच्या घोषणेनंतर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले.
- आझाद मैदानास मनाई: पूर्वपरवानगीशिवाय मनोज जरांगे यांना मुंबईतील आझाद मैदानात पुढील दोन आठवडे आंदोलन करता येणार नाही.
- पर्यायी जागा: गणेशोत्सवादरम्यान वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी, सरकारने जरांगे यांना नवी मुंबई किंवा खारघरसारख्या ठिकाणी परवानगी देण्यावर विचार करावा, असेही न्यायालयाने सूचित केले.
दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयानंतरही मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असून, मुंबईत येण्याचा निर्धार त्यांनी कायम ठेवला आहे. त्यांच्या आणि सरकारमध्ये सध्या चर्चा सुरू असली तरी, न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे आता त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


