Vaibhav Khedekar : वैभव खेडेकर यांना मनसेतून ‘बडतर्फ’; भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे राज ठाकरेंचा मोठा निर्णय

•‘पक्षाचे नियम मोडल्याने कारवाई’; कोकणातील प्रमुख शिलेदाराची मनसेतून हकालपट्टी
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आलेले मनसेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांना अखेर पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांच्यासोबतच अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे, आणि सुबोध जाधव यांचीही मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे कोकणात मनसेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2006 मध्ये पक्षाची स्थापना केल्यापासून वैभव खेडेकर हे त्यांचे विश्वासू आणि महत्त्वाचे शिलेदार मानले जात होते. कोकणात मनसेची संघटना उभी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. खेड नगरपरिषद निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि ते स्वतः खेडचे नगराध्यक्ष होते. दापोली आणि खेड परिसरात त्यांचा तरुणांमध्ये मोठा जनसंपर्क आहे.

भाजप प्रवेशाच्या चर्चांना बळ
गेल्या काही दिवसांपासून खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. दापोलीत झालेल्या महायुतीच्या एका कार्यक्रमात ते भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी महायुतीच्या नेत्यांनी त्यांना जाहीरपणे भाजपमध्ये सामील होण्याची ऑफर दिली होती. विशेषतः, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ‘भैरीच्या पायाखाली मतभेद गाडत आहोत,’ असे सांगत त्यांच्याशी असलेला जुना संघर्ष संपल्याचे संकेत दिले होते.
या सर्व घडामोडींनंतर, मनसेने वैभव खेडेकर यांच्यासह इतर तीन पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली. ‘आपण पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे, तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे,’ असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता वैभव खेडेकर यांचा भाजपमधील प्रवेश निश्चित मानला जात आहे.



