
ED ON Anil Ambani : 17 हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्याचा आरोप, सीबीआयने मागितली कागदपत्रे
मुंबई :- उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. येस बँकेतील 17 हजार कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणी आता सक्तवसुली संचालनालयापाठोपाठ (ईडी) केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) अनिल अंबानी यांच्या सहा ठिकाणांवर छापे टाकले आहेत. या छाप्यांच्या वेळी अनिल अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय निवासस्थानी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी ईडीने याच प्रकरणात छापे टाकले होते. आता सीबीआयने थेट कारवाई केल्याने या प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. तपास यंत्रणांचा आरोप आहे की, येस बँकेने रिलायन्स ग्रुपच्या अनेक कंपन्यांना पुरेसे तारण नसताना मोठे कर्ज दिले. हे कर्ज एका विशिष्ट कामासाठी मंजूर केले गेले असले, तरी ते इतर शेल कंपन्यांमध्ये वळवण्यात आले आणि इतर कामांसाठी वापरण्यात आले. हा मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंग असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.
अनिल अंबानींच्या ठिकाणांवर छापे का?
- येस बँकेने दिलेल्या 17 हजार कोटींच्या कर्जात घोटाळा झाल्याचा आरोप. • मंजूर केलेले कर्ज अन्य कंपन्यांमध्ये वळवल्याचा आरोप. • सीबीआयने कागदपत्रे मागितल्यानंतर अनिल अंबानी यांनी 10 दिवसांचा वेळ मागितला होता. • हा वेळ न देता सीबीआयने आज सहा ठिकाणांवर छापे टाकले.
या छाप्यांमध्ये सीबीआयने अनेक महत्त्वाची कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि त्यांच्याशी संबंधित इतर कंपन्यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली. सीबीआयने याआधीच दोन एफआयआर दाखल केले होते, त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता. या दोन्ही केंद्रीय तपास यंत्रणांच्या संयुक्त कारवाईमुळे अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.


