
Mumbai University Exam Schedule : 19 ऑगस्टच्या परीक्षा पुढे ढकलल्या, आता 23 ऑगस्ट रोजी होणार; विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 19 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि त्यांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, आता या परीक्षा 23 ऑगस्ट 2025 रोजी नियोजित वेळेनुसार होणार आहेत. Mumbai University Latest Update
राज्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मराठवाड्यात लाखो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. मुंबईसह उपनगर परिसरातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा आढावा घेतला असून, स्थानिक प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
परीक्षांचे नवीन वेळापत्रक
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या रद्द झालेल्या परीक्षांमध्ये एम.ए. कम्युनिकेशन, बी.फार्म., एम.कॉम. (ईकॉमर्स), बी.एड. यांसारख्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. संबंधित महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, सुरक्षितपणे घरात राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे शक्य होणार आहे.


