Pune Crime News : फिल्मी स्टाईल पाठलाग करून लाखो रुपयांचे लॅपटॉप जप्त, तामिळनाडूतील चोरटा जेरबंद!

•लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई
पुणे :- पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर पोलिसांनी एका हायटेक लॅपटॉप चोराला फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 1 लाख 95 हजार रुपयांचे 5 चोरीचे लॅपटॉप जप्त केले आहेत. विशेष म्हणजे, ताब्यात घेतलेला आरोपी हा तामिळनाडू राज्यातील असून, त्याच्या अटकेमुळे वाघोली येथे झालेल्या लॅपटॉप चोरीचा गुन्ह्याचा छडा लागला आहे.
बुधवारी (13 ऑगस्ट 2025) लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे तपास पथक नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. त्याचवेळी गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली की, एक संशयित व्यक्ती काळ्या रंगाची जड बॅग घेऊन चिंतामणी पार्कजवळ फिरत आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयिताने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता, पळताना तो ठेच लागून खाली पडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले नाव सागर नागराज (वय 31, रा. तामिळनाडू) असल्याचे सांगितले.
वाघोली येथील गुन्हा उघडकीस; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
सागर नागराजच्या बॅगेची तपासणी केली असता, त्यात 5 महागडे लॅपटॉप आढळले. अधिक चौकशीत त्याने हे लॅपटॉप 12 ऑगस्ट रोजी पहाटे वाघोली, ता. हवेली येथून चोरल्याची कबुली दिली. याबाबत वाघोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यावर, तेथे लॅपटॉप चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीला जप्त केलेल्या मुद्देमालासह वाघोली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता पाटील आणि पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. या कामगिरीमुळे पुणे शहरातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यास मदत झाली आहे.



