Rohit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत ‘नाट्यमय’ घडामोड

•हकालपट्टी झालेले सूरज चव्हाण थेट प्रदेश सरचिटणीसपदी; रोहित पवारांची टीका
मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक धक्कादायक आणि नाट्यमय घडामोड समोर आली आहे. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी ज्या सूरज चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, त्याच चव्हाण यांना अवघ्या काही दिवसांत पुन्हा पक्षात घेऊन थेट प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काही काळापूर्वी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी अजित पवार यांनी कठोर भूमिका घेत पक्षाची शिस्त पाळली जावी यासाठी चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवरून त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.
रोहित पवारांनी उपस्थित केले प्रश्न
सूरज चव्हाण यांच्या या नियुक्तीमुळे पक्षाच्या अंतर्गत वादावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. लातूरमधील गुंडगिरीच्या घटनेनंतर चव्हाण यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय योग्य होता, पण महिनाभरातच त्यांना प्रमोशन दिल्याने याला काय म्हणायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “अजितदादांच्या पक्षात दोन गट आहेत आणि दुसरा गट जाणीवपूर्वक अजितदादांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. ‘शब्दाला पक्का’ या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठीच ही वादग्रस्त नियुक्ती केली असावी.” त्यांनी ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असे म्हणत पक्षाच्या या निर्णयावर टीका केली आहे.



