
Worli BDD Chowls Latest News : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप; आदित्य ठाकरे कार्यक्रमाला अनुपस्थित
मुंबई :- मुंबईतील बहुचर्चित वरळी बीडीडी चाळ Worli BDD Chowls पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आज (14 ऑगस्ट) 556 रहिवाशांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या म्हाडाकडून सुपूर्द करण्यात आल्या. यशवंत नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या प्रकल्पांतर्गत जुन्या चाळींतील रहिवाशांना 500 चौरस फूट चटई क्षेत्रफळाची अद्ययावत सुविधांनी युक्त 2 बीएचके सदनिका मोफत दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात इमारत क्रमांक एकमधील डी आणि ई विंगमधील सदनिकांचे वाटप करण्यात आले असून, प्रत्येक सदनिकाधारकास पार्किंगची सुविधाही मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव असूनही भाषणाच्या यादीत उल्लेख नसल्याने त्यांनी या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्याऐवजी ठाकरे गटाचे इतर नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईतील वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास केला जात आहे. सुमारे 92 एकर जागेवरील 195 चाळींमध्ये 15,593 सदनिकांचा समावेश आहे. या प्रकल्पात वरळीतील 121 चाळींमधील 9,689 रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. जुन्या 160 चौरस फुटांच्या खोल्यांच्या जागी आता 40 मजल्यांच्या 34 पुनर्वसन इमारती उभारण्यात येत असून, पात्र रहिवाशांना प्रशस्त घरे मिळणार आहेत.



