Vasai Hit And Run Case : अनोळखी मृतदेहाचे गूढ 12 तासांत उकलले; हिट अँड रन प्रकरणी ट्रकचालक जेरबंद

Vasai Hit And Run Case Latest News : ‘दारूच्या नशेत’ असलेल्या चालकाचा पर्दाफाश ;नायगाव पोलिसांची कामगिरी
वसई :- नायगाव परिसरातील म्हात्रेवाडीला जाणाऱ्या रस्त्यावर आढळलेल्या एका अनोळखी मृतदेहाचे गूढ पोलिसांनी अवघ्या 12 तासांत उकलले आहे. हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी एका ट्रकचालकाला अटक केली असून, मृतदेहाची ओळख पटवण्यातही त्यांना यश आले आहे. दारूच्या नशेत असताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने ही घटना घडल्याचे तपासात समोर आले आहे. Vasai Latest Crime News
2 ऑगस्ट रोजी सायंकाळी डायल 112 वर नायगाव पोलिसांना एक कॉल आला. म्हात्रेवाडी-जुचंद्र रस्त्यावर एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची तपासणी केली असता, त्यांच्या पोटाखाली आणि छातीवर गंभीर जखमा आढळल्या. यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान स्वीकारले. परिसरातील चौकशीत मृत व्यक्तीचे नाव देवेंद्र उर्फ दीपक हरीश पुरी (वय 35) असल्याचे निष्पन्न झाले.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण महत्त्वाचे ठरले
नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कदम यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखले. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेची दोन पथके तयार करून तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये मृत व्यक्ती दारूच्या नशेत पायी जात असताना दिसली. याचवेळी, एका ट्रकने त्याला जोरदार धडक दिल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट झाले.
आरोपीची कबुली
तांत्रिक कौशल्याचा वापर करून पोलिसांनी ट्रकचालक शिवशंकर सालीकराम निषाद (वय 52, रा. जुचंद्र, नायगाव) याचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, शिवशंकरने आपला गुन्हा कबूल केला. त्याने बेदरकारपणे ट्रक चालवून दीपक पुरीला धडक दिल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत सोडून पळ काढल्याचे सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी मोटार अपघात आणि खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली. यात पोलीस निरीक्षक अभिजीत मडके, सहायक निरीक्षक गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


