Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या ‘मागील रांगे’तील फोटोवरून वाद चिघळला; शिंदे गटाचे नेते स्मृतीस्थळावर

Uddhav Thackeray: माफ करा, सडका मेंदू साफ करा’ म्हणत शिंदे गटाची बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरून ठाकरेंवर टीका
मुंबई :- दिल्लीतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना सर्वात मागील रांगेत बसवल्याच्या फोटोवरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसने उद्धव ठाकरेंचा अपमान केल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी आज (8 ऑगस्ट) दादर येथील शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जोरदार घोषणाबाजी केली.
या घटनेमुळे संतापलेल्या शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाऊन स्वतःची अवहेलना करून घेतल्याचे म्हटले आहे. आज सकाळी आमदार मनीषा कायंदे, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना वंदन केले. यावेळी त्यांनी ‘बाळासाहेबांना वंदन करून उद्धव ठाकरेंना माफ करा’ अशी भूमिका मांडली.
स्मृतीस्थळावर ‘माफ करा, सडका मेंदू साफ करा’ अशा घोषणाही देण्यात आल्या. या घोषणाबाजीमुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि स्मृतीस्थळावर उपस्थित असलेल्या सामान्य नागरिकांमध्येही काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काल (७ ऑगस्ट) रोजी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ‘इंडिया’ आघाडीची बैठक पार पडली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे मागील रांगेत बसलेले दिसले. याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजपने उद्धव ठाकरेंवर टीका सुरू केली.


