
Eknath Shinde Meet Amit Shah : स्थानिक निवडणुका, एनडीएतील समन्वय आणि शिवसेनेची नाराजी बैठकीच्या केंद्रस्थानी
मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर असून, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांची भेट घेणार आहेत. एका आठवड्यात शिंदे यांचा हा दुसरा दिल्ली दौरा असून, यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे दुपारी एक वाजता अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतील, त्यानंतर ते पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, एनडीएतील समन्वय, आणि शिवसेनेच्या काही मुद्द्यांवरील नाराजी या भेटींमागे असल्याचे बोलले जात आहे. भाजप नेते परिणय फुके यांनी केलेल्या विधानामुळे शिवसेनेमध्ये निर्माण झालेली नाराजीदेखील या चर्चेचा एक महत्त्वाचा भाग असू शकते.
शिवाय, येत्या काही दिवसांत होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या संदर्भातही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः शिवसेनेच्या भूमिकेत काही महत्त्वाचे बदल होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली भेटीपूर्वी शिंदे यांच्या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वीच शिंदे यांच्या दिल्ली भेटीमुळे राजकीय वर्तुळात या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.


